मराठी व्याकरण कल्पनाविस्तार
मराठी व्याकरण कल्पनाविस्तार
मराठी व्याकरण कल्पनाविस्तारआपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी भाषा ही फार महत्त्वाची भूमिका साकारत असते. प्रत्येकाला व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी भाषेची मदत घ्यावी लागते.
जेवढे भाषिक ज्ञान अधिक तेवढीच आपली आकलन शक्तीही सुधारण्यास संधी मिळते. भाषेचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे असते.
उत्तम लेखन ही एक कला आहे. ती कला ज्याला साध्य होते तो प्रतिभावान लेखक ठरतो. सर्जनशील लेखनामध्ये परिच्छेदलेखन, सारांशलेखन, दैनंदिनीलेखन, कथालेखन, पत्रलेखन, निबंधलेखन, कल्पनाविस्तार आदी लेखनप्रकारांचा समावेश होतो. आपण येथे कल्पनाविस्तार हा लेखनप्रकार अभ्यासणार आहोत.
🌿कल्पनाविस्तार :🌿
कल्पनाविस्तार म्हणजे एखाद्या ओळीतील कल्पनेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करणे. शब्दशः अर्थाबरोबरच त्या ओळीतून सूचित होणारा गर्भितार्थ, लक्ष्यार्थ समजून घेऊन त्या वेगवेगळ्या अर्थछटांचे स्पष्टीकरण करावे लागते.
विविध दाखले, उदाहरणे देऊन लालित्यपूर्ण लेखन करून त्या कल्पनेतील विविध अर्थ वाचकापर्यंत पोहोचवणे म्हणजे कल्पनाविस्तार.
सुवचन, सुभाषित, काव्यपंक्ती, म्हण यांचा कल्पनाविस्तार केला जातो.
कल्पनाविस्तारातील पायर्या
१. सुरुवातीला कल्पनेचा अर्थ मांडावा.
२. विविध उदाहरणे देऊन कल्पना स्पष्ट करावी.
३. मतितार्थ समजावून देण्यासाठी इतिहासातील, पुराणातील, तत्कालीन दाखल्यांचा वापर केल्यास आशय अधिक परिणामकारकतेने वाचकापर्यंत पोहोचतो.
४. शेवटी नेमकेपणाने, पूर्ण निबंधाचे सार मोजक्या शब्दांत सांगावे.
🌺कल्पनाविस्तार करताना पुढील बाबी उपयुक्त ठरतात🌺
श्रवण, वाचन, संभाषण, निरीक्षणे ही कौशल्ये आत्मसात केल्यास कल्पनाविस्तार करताना आपली अभिव्यक्ती अधिक प्रभावी व ज्ञानसमृद्ध होते.
बहुश्रुत व व्यासंगी व्यक्तीच्या लेखनात त्याच्या ज्ञानाची, माहितीची छाप कायमच पडते. यासाठी आपला व्यासंग वाढवावा, जेणेकरून लेखन सशक्त व परिणामकारक होते.
भाषा ओघवती, सुलभ परंतु तरीही लालित्यपूर्ण असावी.
शब्दयोजना करताना व्यवस्थित विचार करावा, कारण नेमकी शब्दयोजना केल्यास कल्पना किंवा विचार अधिक सुस्पष्टपणे मांडता येतो.
आपला शब्दसंग्रह विपुल असावा. वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार संग्रही असावेत. योग्य ठिकाणी उचित म्हणींचा किंवा शब्दांचा नेमका वापर केल्यास कल्पनाविस्तार अधिक चांगल्याप्रकारे मांडला जातो.
लेखनात विशेषणे, क्रियाविशेषणे यांचा वापर करून भाषेला सजवावे, अलंकृत करावे.
कल्पनाविस्तार हा विचारांना, कल्पनेला चालना देणारा, अलंकारिक, प्रासादिक भाषेने सजलेला असा लेखनकलेचा उत्तम नमुना होय. लघुनिबंधाचे एक प्राथमिक रूप म्हणजेच कल्पनाविस्तार असे म्हणता येईल