मराठी व्याकरण शुद्धलेखन

मराठी व्याकरण शुद्धलेखन म्हणजे काय?

आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात ‘भाषा’, व तेच लिहून दाखविण्याला ‘लेखन’ म्हणतात.           

आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व – दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व बोलण्यातील शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरांत लिहून दाखविणे याला स्थूलमानाने ‘शुद्धलेखन’ म्हणायला हरकत नाही.   

🌷आपण जे लिहितो ते शुद्ध म्हणजे निर्दोष असावे असे सर्वांना वाटते. हे लेखन शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले असतात. यांनाच ‘शुद्धलेखनविषयक नियम’ असे आपण म्हणतो.         

🌷शुद्धलेखनाबाबतचे आजचे नियम पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झालेले आहेत. ते नीट समजावून घेतले की आपले लेखन निश्चित सुधारते.

🌷आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा एका विशिष्ट ठरलेल्या पद्धतीनेच बोलली किंवा लिहिली गेली तरच ती ‘शुद्ध’ समजली जाते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते.   

🌷जसे ‘तो पुस्तक वाचतो’, ‘त्याने पुस्तक वाचले’, ‘त्याने पुस्तके वाचली’ अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी ‘तो पुस्तक वाचला’, ‘त्याने पुस्तक वाचली’, ‘त्याने पुस्तके वाचतो’ अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते.    

🌷आपण लिहितो त्या शब्दाचे किंवा वाक्याचे शुद्ध स्वरूप कोणते व अशुध्द स्वरूप कोणते यांबाबत काही नियम ठरविण्यात आले आहेत. हे नियम हाच व्याकरणाचा विषय, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्धलेखन. ‘शुध्दलेखन’ हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच एक भाग आहे.  

मराठी व्याकरण शुद्धलेखन

🌷शुद्धलेखनात शब्दांतील -हस्व – दीर्घ अक्षरे व अनुस्वार यांचाच आपण प्रामुख्याने विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवद्याचाच विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवढाच मर्यादित अर्थ नाही.

🌷 शब्दांतील अक्षरांचे लेखन एवद्याचाच विचार यांच्याही शुद्धलेखनात कारवायचा नसून वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम व त्यांची अचूक योजना, जोडाअक्षरातील वर्णांची अचूक रचना, विरामचिन्हाचा योग्य वापर यांच्याही शुद्धलेखनात समावेश होतो. 

🌷तसेच जोडशब्द तयार करताना शेजारचे वर्ण एकमेकांत मिसळतात; अनेक शब्दांचा एक शब्द करताना त्यातले काही शब्द कसे गळतात; व नवीनच शब्द कसे तयार केले जातात ( म्हणजेच संधी, समास व शब्दसिद्धी)   यांच्याही विचार शुद्धलेखनात अवश्य करावा लागतो.   

🌷आधी भाषा, मग व्यकरण :          

‘🌷शुद्धलेखन’ हा शब्दच थोडा फसवा आहे. आपले लेखन कशा प्रकारे करावे याबद्दल प्रारंभीच्या व्याकरणकारणी काही नियम ठरविले. त्याप्रमाणे जे लिहिले जाई ते त्या वेळी शुद्ध समजले जात असे.        

🌷पूर्वी मराठीत अनुस्वार बऱ्याच ठिकाणी दिले जात. उदा. ‘नाही’ वर अनुस्वार द्यावा लागे. ‘काही’ मधल्या दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत. ‘मी कामे केली’ हे वाक्य ‘मी कामें केली’ असे सानुस्वार लिहावे लागे. 

🌷याचे कारण त्या वेळच्या लोकांच्या बोलण्यात नासोच्चार खूप होते. त्यास अनुसरून, त्यात व्याकारणीक अनुस्वरांची भर घालून, तसेच अर्थभेद, व्युत्पत्तीने व परंपरा यांचाही विचार करून अनुस्वार कोठे द्यावेत व -हस्व – दीर्घ केव्हा लिहावे हे ठरविण्यात आले होते

🌷. आता आपण तसा उच्चार करत नाही. आपल्या उच्चारात आता खूप बदल झाला आहे. म्हणून हे अनुस्वार आजच्या लेखनातून नाहीसे झाले आहेत.      

🌷पूर्वीच्या लेखनावर संस्कृतचा पगडा विशेष होता. त्यामुळे शब्दामध्ये येणारे इ-कार व उ-कार संस्कुतपामने -हस्व लिहिले जात. आता आपण मराठीचे लेखन मराठीच्या उच्चारानुसार लिहू लागलो आहे. 

🌷प्रारंभी केलेल्या नियमांत आतापर्यंत वेळोवेळी बदल होत राहणार. भाषा बदलत चालली म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. आधी भाषा बनते; मग तिचे व्याकरण ठरते.  

मराठी व्याकरण शुद्धलेखन

🌷भाषेत बदल होत गेला की व्यकरणकारकाला शरणागती पत्करावी लागते व पूर्वीच्या नियमांना मुरड घालावीच लागते. परिणामतः लेखनविषयक ठरलेल्या नियमांतही बदल करावाच लागतो. 

🌷लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपण बोलताना वर्णाचा जसा उच्चार करतो तसे लिहिणे. पण बोलण्यातील उच्चाराप्रमाणे लेखन करावयाचे तर आपली वर्णमाला अपुरी पडते. मराठीतील सगळे उच्चार लिहून दाखविण्याची सोय आपल्या वर्णमालेत नाही. तसेच, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या उच्चारपद्धतीप्रमाणे लिहू लागला तर मोठा कठीण प्रसंग निर्माण होईल. 

🌷एकमेकांचा विचार एकमेकांना समजायला हवा असेल तर एक विशिष्ट लेखनपध्दतीचा अनुसरणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरते. अशा नियमांचा आपण ‘शुद्धलेखनाचे नियम’ म्हणत आलो.  

मराठी शुद्ध लेखनाचे नियम        

अ)अनुस्वार       

१) नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणा-या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.      

उदा.

डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.          

🌷2) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.       

उदा.

लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ.          

🌷३) आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.         

उदा.

शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ.       

मराठी व्याकरण शुद्धलेखन

🌷४) पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.            

जसे – का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे, पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण – या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)    

आ) हस्व – दीर्घ अक्षरे

१) इ – कारान्त आणि ‘उ’ – कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.              

उदा –

मी, कवी, गुरू, बाहू जू, ऋषी, गती, वही, गहू पेरू, वाळू, शत्रू.       

परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार हस्व होतात.          

उदा –

विद्यार्थिभांडार ऋषिकुमार, कविचरित्र, लघुकथा, शत्रुपक्ष इ.          

अपवाद – अति, आणि, नि, परंतु, तथापि, अद्यापि, यद्यपि, प्रभृति, यथामति, यथाशक्ति, इति, ही अवये हस्वातच लिहावी.      

२) सामासिक शब्दातील पहिले पद हस्व ‘इ’ कारान्त 

२) सामासिक शब्दातील पहिले पद हस्व ‘इ’ कारान्त किंवा ‘उ’ कारान्त असल्यास ते हस्वातच राहते. आणि ते पद दीर्घ ‘ई’ कारान्त किंवा ऊ’ कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घातच राहते.    

उदा –

कविचरित्र, गतिमान, गुरुवर्य, पशुपक्षी, युक्तिवाद, लघुकथा, वायुपुत्र, शक्तिमान, हरिनाम, गौरीहर, वधूवर इ. 

३) अकारान्त शब्दातील उपान्त्य ‘इ’ कार किंवा ‘उ’ कार दीर्घ असतो. 

उदा –

ऊस, गूळ, चूल, नीळ, दूध, धीट, धूप, नीट, नवीन, पाऊस, पूल, फूल, बहीण, बक्षीस, माणूस, मीठ, मूल, म्हणून, विहीर, तीर, घूस, परीट, बुरूज, कापूस इ.        

मराठी व्याकरण शुद्धलेखन

अपवाद – संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.

उदा –

अरुण, कुसुम, गुण, तरुण, दक्षिण, पश्चिम, प्रिय, मधुर, मंदिर, युग, विष, शिव इ.  

४) एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत – 

उदा –

मी, तू, ती, ही, जी, ऊ, थू, धू, पी, पू, शी इ.             

५) शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा हस्व असते.        

उदा –

दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली, गरिबी, गुरुजी, माहिती, सुरू, हुतुतू इ.         

अपवाद – संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.          

उदा –

परीक्षा, प्रतीक्षा, गीता, पूजा इ.     

) शब्दाच्या शेवटी ‘इक’ प्रत्यय आल्यास ‘क’ पूर्वीचा ‘इ’ कार ‘उ’ कार हस्व लिहावा.        

उदा. –

ऐतिहासिक, कौटुंबिक, धनिक, यांत्रिक, लौकिक, वार्षिक, शारीरिक, सार्वजनिक, साप्ताहिक, नैतिक, पौराणिक, बौधिक, भाविक, भौगोलिक, मानसिक इ.    

७) हळूहळू , लुटूलुटू , मुळूमुळू , दुडुदुडू अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर दीर्घ असते.        

८) गावाच्या नावात शेवटी ‘पूर’ ही अक्षरे असल्यास त्यातील ‘पू’ नेहमी दीर्घ लिहावे.  

उदा.

नागपूर, विजापूर इ.  

इ) सामान्यरूप  

मराठी व्याकरण शुद्धलेखन

१) हस्व ‘इ’ कारान्त व ‘उ’ कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरूप करताना त्या शब्दातील अंत्यस्वर दीर्घ होतो.

उदा. –

रवि – रवीचे, प्रभु – प्रभूला इ.       

२) मराठी शब्दाचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ याने युक्त असल्यास शब्दाचे सामान्यरूप होताना ते उपान्त्य अक्षर हस्व होते.    

उदा. –

वीट – विटेने, मूठ – मुठीत, बहीण – बहिणीला, रायपूर – रायपुरात इ.      

अपवाद – संस्कृतमधून मराठीत आलेल्या अशाप्रकारच्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.  

उदा. –

सीता – सीतेला, पूर्व – पूर्वेकडे, परीक्षा – परीक्षेसाठी, पूजा – पूजेकरिता इ.   

ई) इतर      

१) कोणता, एस्वादा हे शब्द कोणचा व एकादा असे लिहू नये.     

२) ‘ए’ कारान्त नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त करावे.    

उदा. –

फडके – फडक्यांना, रस्ते – रस्त्यांना, हसणे – हसण्यासाठी, आंबा – आंब्याना, लिहीणे – लिहिण्यासाठी.       

३) धातूला ‘ऊन’ व ‘ऊ’ प्रत्यय लागताना मूळ धातूत शेवटी ‘व’ असल्यास त्यावेळी ‘वून’ व ‘वू’ किंवा ‘ऊन’, ‘ऊ’ अशी रूपे होतात.     

उदा –

धाव – धावून, धावू, जेव – जेवून, जेवू, जा – जाऊन, जाऊ, इ.         

४) राहणे, पाहणे, वाहणे हे शब्द असेच लिहावेत. या शब्दांची रहाणे, पहाणे, वहाणे, ही चुकीची रूपे असल्याने ही लिहू नयेत.      

५) मराठीत रुढ झालेले तत्सम व्यंजनांत शब्द ‘अ’ कारान्त लिहावेत. त्यातील शेवटच्या अक्षराचा (संस्कृतातल्याप्रमाणे) पाय मोडू नये.     

उदा –

अर्थात, क्वचित, पश्चात, विद्युत, साक्षात, कदाचित, भगवान, विद्वान, तस्मात इ.                   

६) लिहिताना एखाद्या माणसाच्या तोंडचे शब्द त्याच्या मूळ उच्चारा प्रमाणे जसेच्या तसे लिहावेत.  

उदा. –

मला असं वाटतं की मिलापचं चित्र बरोबर असावं      

काही शुद्ध शब्द – 

अधिक, अधीन, अधीर, अनिल, इच्छा, इयत्ता, ईर्षा, ईश, ईश्वर, उद्योग, उज्ज्वल, उष्ण, उत्कृष्ट, उर्फ, एखादा, एकूण, कर्तृत्व, कीर्ती. क्रीडा, खड्ग, गृहस्थ, जीवन, ज्येष्ठ, द्वितीया, तृतीया. निःस्पृह, परामर्ष, पृष्ठ, पृथ्वी, बृहस्पती, मातुःश्री, महत्त्व. मुत्सद्दी, लक्ष्मण, वक्तृत्व, वृक्ष, सत्त्व, क्षत्रिय, ज्ञानेश्वर इ.

About Prithviraj Gaikwad

Check Also

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4

Shabdsamuhabaddal Ek Shabd-4-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-34शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabdsamuhabaddal Ek Shabd -शब्दसमूहाबद्दल एक …

Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द

स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3-स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-3 शब्दसमूहाबद्दल एक …

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6

Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-6-Samanarthi Shabd in Marathi: समानार्थी शब्द  एकाच भाषेतील दोन किंवा …

Contact Us / Leave a Reply